31 October

*@ ३१ मार्च @*
*राष्ट्रीय एकता दिन*

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ३१ ऑक्टोबर हा 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरा करत आहे, जे देशाचे पहिले गृहमंत्री देखील होते, ज्यांचे स्वातंत्र्या नंतर अनेक संस्थानिकांना भारत संघात सामील होण्यासाठी त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. भारताच्या एकात्मतेसाठी पटेल यांच्या महत्त्वपूर्ण प्रयत्ना बद्दल देश कृतज्ञ आहे, म्हणून हा दिवस 'राष्ट्रीय एकात्मतेला' श्रद्धांजली म्हणून साजरा केला जातो. सरकारने २०१४ मध्ये घोषित केले की, ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरी केली जाईल. वल्लभभाई पटेल यांना 'सरदार' म्हणून संबोधले गेले होते. त्यांच्या नेतृत्व कौशल्यामुळे स्वातंत्र्याच्या लढ्यात आणि त्यापलीकडे, आणि विशेषतः संस्थानांचे एकत्रीकरण आणि १९४७ च्या भारत पाकिस्तान युद्धा दरम्यान. सरदार पटेल यांनी ब्रिटीश अधिपत्यातून मुक्त झालेल्या ५६५ स्वराज्य संस्थाना पैकी जवळपास प्रत्येकाला भारत संघात सामील होण्यासाठी राजी करण्याचा अतुलनीय पराक्रम साधला. नव्याने स्वतंत्र झालेल्या देशाच्या राष्ट्रीय एकात्मते बद्दलच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी, सरदार पटेल यांना 'भारताचा लोहपुरुष' ही पदवी मिळाली.

राष्ट्रीय एकता दिना निमित्त सरकारी कार्यालया मध्ये प्रतिज्ञा वाचून दाखवली जाते. “मी शपथ घेतो की मी देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्यासाठी स्वतःला समर्पित करीन आणि हा संदेश माझ्या देशबांधवा मध्ये पोहोचवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी आणि कृतीमुळे शक्य झालेल्या माझ्या देशाच्या एकीकरणाच्या भावनेने मी ही शपथ घेत आहे. मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी माझे स्वतःचे योगदान देण्याचाही संकल्प करतो.” अधिकृत आदेशानुसार, सर्व सरकारी कार्यालये, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू) आणि इतर सार्वजनिक संस्थांनी ३१ ऑक्टोबर रोजी 'राष्ट्रीय एकता दिवस' साजरा करण्यासाठी प्रतिज्ञा समारंभ आयोजित करणे आवश्यक आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयाने शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकता दिवसाची प्रतिज्ञा घेण्यास परवानगी देण्याच्या सूचनाही जारी केल्या आहेत, जेणेकरून त्यांना देशाची एकता आणि अखंडता राखण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले जावे.

*@ ३१ ऑक्टोबर @*
*राष्ट्रीय संकल्प दिन*

भारतातील प्रत्येक खेड्यापाड्यात व घराघरात परिचित असलेला शालीन चेहरा कोणाचा असा प्रश्न केल्यास, त्याचं एकमेव उत्तर येईल ते म्हणजे इंदिरा गांधी. भारतासारख्या खंडप्राय देशाच्या दीर्घकाळ राहिलेल्या एकमेव नेता म्हणजेच पंतप्रधान म्हणून श्रीमती इंदिरा गांधी होत. आपल्या कर्तृत्वाने इंदिराजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. या पदावर काम करताना त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणावरही प्रभाव पाडला. ३१ ऑक्टोबर हा इंदिराजींचा स्मृतिदिन 'राष्ट्रीय संकल्प दिवस' म्हणून पाळला जातो. त्यांचा जन्म अलाहाबाद येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासून भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्य सैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली 'वानरसेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस मध्ये प्रवेश केला. १९५५ मध्ये त्या काँग्रेस कृतीसमितीच्या व सेन्ट्रल पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या. फेब्रुवारी १९५९ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष्या म्हणून निवडून आल्या. केद्रीय मंत्रिमंडळात त्या १९६४ साली प्रथम रूजू  झाल्या. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात माहिती व नभोवाणी मंत्री म्हणून त्यांनी त्या वेळी कार्य केले. लाल बहादूर शास्त्री यांचा ताश्कंद येथे १९६६ मध्ये मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष कामराज यांच्या पाठिंब्याने १८६ मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून २४ जानेवारी १९६६ रोजी इंदिरा गांधी प्रधानमंत्री म्हणून विजयी झाल्या. इंदिरा गांधी यांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घटनांमध्ये १९७७ साली त्यांनी देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. तसेच ऑपरेशन ब्लू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला. पण अखेर त्यामुळेच त्यांच्याच २ सुरक्षा रक्षकांकडून त्यांची हत्या झाली. एक थोर साहसी स्त्री, अखेर हुतात्मा झाली. एक तेजपुंज व्यक्तिमत्व लोप पावले. त्या गेल्या पण त्यांचे उत्तुंग व्यक्तिमत्व आजही भारतीयांचा मनावर कोरलेले आहे. त्यांच्या स्मृतीला आम्हां सर्वांचे शतशः प्रणाम.

*✹ ३१ ऑक्टोबर ✹*
*लेखिका आनंदीबाई शिर्के स्मृतिदिन*

जन्म - ३ जून १८९२ (मुंबई)
स्मृती - ३१ ऑक्टोबर १९८६

लेखिका, बालसाहित्यिका आनंदीबाई शिर्के या त्यांच्या ‘सांजवात’ या आत्मचरित्रामुळे प्रसिद्ध झाल्या. आनंदीबाईंनी ‘सांजवात’ या पुस्तकातून जुन्या काळातील स्त्री जीवनाचं वास्तव आणि प्रांजळ चित्रण केलं आहे. एकत्र कुटुंबपद्धती, मुलींवर आणि स्त्रियांवर असलेली बंधनं, समाजातल्या रूढी, अशा अनेक गोष्टींचा वेध त्यांनी घेतला आहे. आनंदीबाईंचं माहेरचं नाव अनसूया होतं. त्यांचे वडील पुण्यातले. पण त्यांनी बडोदे संस्थानात सयाजीराव गायकवाडांकडे नोकरी घेतली व ते तिथे राहायला गेले. आनंदीबाई तेव्हा तशा लहान होत्या. १९१० मध्ये मासिक मनोरंजन मध्ये कु.आनंदी या नावानं एक कथा छापून आली. अनेकांचं या नव्या नावाने लक्ष वेधून घेतलं. कथेचं नाव होतं ‘शारदाबाईंचे संसारचित्र’ या नावातच सारं काही समजतं. मात्र १९१२ मध्ये ‘मराठा मित्र’ ने याच लेखिकेची ‘बेगम दिलआरा’ ही एक मोगल काळातील प्रेमकथा छापली. आणि या लेखिकेला खूप मान्यता मिळवून दिली. प्रसिद्ध लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी संपादकांकडे विचारणा केली. ‘या कथेचे रचनाकौशल्य, पात्रांचे स्वभाव रेखाटन इतके वाखाणण्यासारखे आहे, एखाद्या पुरुष लेखकानेच टोपण नावाने ही कथा लिहिली नाही ना?’ आणि मग आनंदीबाई लिहीतच राहिल्या. सर्व महत्त्वाच्या आणि सामाजिक भान असणाऱ्या पत्रांमधून लेखन करत राहिल्या. 

शिकणाऱ्या, नोकरी करू पाहणाऱ्या, अर्थार्जनानं येणाऱ्या स्वातंत्र्याची चव चाखू पाहणाऱ्या स्त्रियांची चित्रं, त्यांचे प्रश्न आनंदीबाईंच्या कथांमधून उमटायला लागले. प्रत्यक्ष आयुष्यातही आनंदी एक धाडसी, कणखर, आधुनिक विचारांची तरुणी होती. घरातच त्यांच्यातलं वेगळेपण आणि तेज जाणवू लागलं होतं. परिचारिकेचं प्रशिक्षण घेऊन, तोच व्यवसाय पत्करणार आणि वडिलांना हातभार लावणार असा निश्चय करून त्या एकविसाव्या वर्षापर्यंत विवाहापासून दूर राहिल्या. त्या काळात ही बंडखोरीच होती. आपला परिचारिकेचा व्यवसाय निष्ठेने सुरू करून आनंदीबाईंनी लेखनालाही प्रारंभ केला. आनंदीबाईंचा विवाह म्हणजे त्या काळात लेखिका आणि संपादक यांचे भावबंध जुळून प्रेमविवाह होण्याचं हे दुर्मीळ उदाहरण आहे. पण शिवराम शिर्के हे मराठा मित्रचे कार्यकारी संपादक होते. कोकणातील खानदानी मराठा. ते विचारांनी पुरोगामी, पण देशावरल्या मराठा मुलीशी लग्न ठरवल्या बद्दल शिर्के यांच्या कुटुंबाला त्यावेळी फार त्रासातून जावं लागलं. आनंदीबाई आणि शिवरामपंत दोघांनीही खूप संयमानं अनेक गोष्टी सहन केल्या. वडील लवकर निवृत्ती घेऊन मुंबईला आल्यानंतर सारेजण मुंबईत राहिले. मुलींची लग्नं उरकणं हा वडिलांसमोरचा एककलमी कार्यक्रम होता. विवाहाच्या संदर्भात लिहिताना आनंदीबाईंनी मराठा समाजाच्या एकूण मानसिकतेवर प्रकाश टाकला आहे. स्वतःच्या कुटुंबाच्या, घराण्याच्या जुनाट परंपरांच्या अभिमानापुढे इतर हितकर बाबींकडे दुर्लक्ष करण्याऱ्या समाजाच्या या प्रवृत्तीवर त्यांनी बोट ठेवलं आहे. 

आनंदीबाईंना शिकण्याची आवड होती, पण उत्तमप्रकारे शिक्षण घेणं त्यांना परिस्थितीमुळे जमलं नाही. शिकता न आल्याने नोकरी मिळवणं कठीण बनलं. नर्सिंग शिकून ते काम करता येईल असं त्यांना वाटत होतं, पण या गोष्टीला घरातून विरोध झाला. पुस्तकांची सोबत आणि वाचनाची आवड मात्र त्यांनी मनापासून जोपासली. वाचनातूनच त्यांना लिहायची प्रेरणा मिळाली. नर्सिंगला जाता आलं नाही, तरी त्या चंद्राबाई नावाच्या सुईणी बरोबर जाऊन बाळंतपणाच्या केसेस बघत. त्या कथालेखन करत आणि लेखनामुळे त्यांचा परिचय ‘मराठामित्र’चे सहसंपादक शिवराम शिर्के यांच्याशी झाला. परिचयाचं रूपांतर पुढे प्रेमात आणि त्यानंतर लग्नात झालं. दोघेही मराठा समाजातले असले तरी शिर्के हे कोकणस्थ मराठा आणि शिंदे देशस्थ मराठा असा फरक असल्यामुळे माहेरून या लग्नाला विरोध झाला. कारण त्याकाळी असे विवाह होत नसत. लग्नाची ही गोष्ट सांगताना आनंदीबाईंनी मराठा समाजातील बंदिस्त व झापडबंद रूढींकडे निर्देश केला आहे. या साऱ्या लिखाणात कमालीचा मोकळेपणा आहे. विवाहोत्तर जीवनाबद्दल लिहिताना आपल्या सहजीवनातील अनेक तपशील त्या देतात. त्या स्वतः अत्यंत थेट बोलणाऱ्या अन् परखड स्वभावाच्या होत्या, तर पती शिवराम शिर्के स्वभावाने नरम, सरळपणे सगळ्या गोष्टीकडे बघणारे. दुसऱ्याला नावं न ठेवता आपल्या मार्गाने जाणारे. संसारातले अनेक बरेवाईट प्रसंग यामुळे निभावले गेले. दुसऱ्यामुळे स्वतःला नुकसानीत जायची पाळी आली तरी शिर्के काही न बोलता शांतपणे वागत, त्यामुळे आनंदीबाई चिडत. एकमेकावरील प्रेमाने आणि विश्वासाने त्यांचा संसार खूपच उत्तम झाला.

आनंदीबाई लिखाण करता करता, कौटुंबिक वर्तुळाच्या पलीकडे गेल्याच होत्या. पुढे तर त्या समाजकारण व राजकारणातही सक्रिय बनल्या. हा सारा अनुभव त्यांच्या जीवनाला एक नवं भान देणारा ठरला. सतत स्थलांतर करतच त्यांचा संसार झाला. पुणं, मुंबई, सातारा, खानदेश अशा विविध ठिकाणी नवं घर मांडण्याचा आणि ते चालवण्याचा खटाटोप आनंदीबाई हिमतीने करत. जळगावला राहत असताना स्कूल बोर्डावर सदस्य म्हणून त्या गेल्या आणि त्यांना यामुळे सभेत बोलण्याचा सराव झाला. १९३५  साली जळगावला माधवराव पटवर्धन ऊर्फ माधव ज्युलियन यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यसंमेलन झालं तेव्हा त्यांची निवड स्वागताध्यक्ष म्हणून झाली होती. साहित्यक्षेत्रात त्यांचा अनेक मोठ्या लेखकांशी परिचय झाला. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर त्यांना आपली मुलगीच मानत असत. 

Comments

Popular posts from this blog

थोडा अभ्यास थोडी गंमत

Test